ट्विटर ब्लू भारतातही सुरू, महिन्यासाठी 900 रुपये मोजावे लागणार आहेत

Twitter : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने भारतातही सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात ट्विटर ब्लू सेवेची किंमत 650 रुपयांपासून सुरू झाली आहे. ट्विटर ब्लूसाठी वेब वापरकर्त्यांना दरमहा 650 रुपये मोजावे लागतील. तर मोबाईल वापरकर्त्यांसाठी ते दरमहा 900 रुपये असेल.

इलॉन मस्कने (Elon Musk) गेल्या वर्षी ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये बरेच बदल केले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू सेवेची घोषणाही केली होती. या अंतर्गत, तुम्हाला ट्विटरच्या काही अतिरिक्त सेवांसाठी शुल्क भरावे लागेल.

ट्विटरने नुकतीच अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह (America, Britain, Canada, Australia, New Zealand and Japan) काही देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवा सुरू केली आहे. या देशांमध्ये, वेब वापरकर्त्यांसाठी ट्विटरचे ब्लू सबस्क्रिप्शन शुल्क प्रति महिना $ 8 आहे. वार्षिक सदस्यता घेण्यासाठी $84 खर्च करावे लागतील. ट्विटर अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून $3 अधिक आकारून Google ला कमिशन देईल.

त्याचबरोबर ही सेवा आता भारतात सुरू झाली आहे. असे सांगण्यात येत आहे की भारतात ट्विटर ब्लू सेवा घेण्यासाठी, वेब वापरकर्त्यांना दरमहा 650 रुपये द्यावे लागतील, तर मोबाइल वापरकर्त्यांसाठी दरमहा 900 रुपये शुल्क द्यावे लागेल. मात्र, वार्षिक वर्गणी घेण्यासाठी 6800 रुपये द्यावे लागतील.

ट्विटर ब्लूवर हे फीचर्स उपलब्ध असतील (Features on Twitter Blue) 

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सोबतच यूजर्सला ब्लू चेकमार्क किंवा टिक देखील दिला जातो. यासह, वापरकर्त्यांना ट्विट संपादित करणे, 1080p व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करणे आणि रीडर मोडमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय मिळेल.

याशिवाय, ट्विटर वापरकर्त्यांना कमी जाहिराती पाहायला मिळतील तर नॉन-सबस्क्राइबर्सना आगामी काळात अधिक जाहिराती पाहायला मिळतील. कंपनीने म्हटले आहे की व्हेरिफाईड युजर्सच्या ट्विटला रिप्लाय आणि ट्विटमध्येही प्राधान्य मिळेल. एवढेच नाही तर ही सेवा घेणारे युजर्स 4000 कॅरेक्टरपर्यंतचे ट्वीट पोस्ट करू शकतील.