अभिमानास्पद : गुगल, मायक्रोसॉफ्ट,आयबीएम पाठोपाठ ट्विटरच्या सीईओपदी भारतीय व्यक्ती !

मुंबई : गुगल, मायक्रोसॉफ्ट,आयबीएम, पाठोपाठ आता आणखी एका बलाढ्य टेक कंपनीच्या सीईओपदाची धुरा भारतीयाकडे सोपविण्यात आली आहे. ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल हे आयआयटी मुंबईचे इंजिनिअर आहेत. गेल्या दशकभरापासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. सध्या पराग अग्रवाल हे ट्विटरमध्ये चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. याआधी पराग अग्रवाल यांनी मायक्रोसॉफ्ट,याहू मध्ये देखील काम केले आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी राजीनामा दिला आहे. ट्विटरने याबाबत पुष्टी केली असून सीईओ जॅक डोर्सी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देतील असे सांगितले आहे. सीटीओ पराग अग्रवाल हे आता ट्विटरचे नवे सीईओ असतील. पराग अग्रवाल आयआयटी मुंबईमधून पदवीधर आहेत. ट्विटरचे (Twitter) नवीन CEO अग्रवाल 2011 मध्ये कंपनीत सामील झाले आणि ऑक्टोबर 2017 पासून त्यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केले आहे, जेथे ते नेटवर्कच्या तांत्रिक धोरणासाठी जबाबदार होते. अग्रवाल यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणकशास्त्रात पीएचडी केली आहे. डॉर्सी यांनी कंपनीचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये सुमारे 11 टक्के वाढ झाली.

पराग अग्रवाल यांनी ट्विट करून जॅक डोर्सी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले आहेत. ‘मी भविष्यासाठी प्रचंड उत्साह. मी कंपनीला पाठवलेली नोट ही आहे. तुमचा विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.’ असे पराग अग्रवाल म्हणाले आहेत.

तर, ‘आमच्या कंपनीत सह-संस्थापक ते सीईओ ते अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष ते अंतरिम सीईओ ते सीईओ असे जवळपास 16 वर्षे काम केल्यानंतर, मी ठरवले की मला सोडण्याची वेळ आली आहे. पराग आमचे सीईओ होत आहेत’. असे जॅक डोर्सी म्हणाले आहेत.

हे देखील पहा