युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे १८, १९ मार्च रोजी ‘युरेथ्रोप्लास्टी’वर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

पुणे : अपघातात कमरेचे हाड तुटल्यावर लघवीचा मार्गही तुटतो. अशावेळी लघवीचा तुटलेला मार्ग जोडणे, काही केसमध्ये गालाच्या आतील आवरण वापरून आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. अशा सुमारे १४ ते १६ शस्त्रक्रियांची दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा येत्या १८ व १९ मार्च २०२३ रोजी बाणेर येथील युरोकुल युरॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजिली आहे, अशी माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, बाणेर-बालेवाडी मेडिको असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे आदी उपस्थित होते.

बाणेर येथील १०५ बेडची सुसज्ज व अद्ययावत युरॅालॉजी इन्स्टिट्यूट असलेल्या ‘युरोकुल’मध्ये ही कार्यशाळा होणार आहे. या ‘युरेथ्रोप्लास्टी’ कार्यशाळेत डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी, लंडन येथील प्रा. मंडी, कतार येथील प्रा. पीपी साले या तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. ‘युरोकुल’मध्ये होणाऱ्या या विविध शस्त्रक्रियांचे प्रसारण बंटारा हॉल येथे होणार आहे. पाचशे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “पूर्वीच्या काळी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया, स्वतः नळी घालून मूत्रमार्ग मोठा करणे अशा उपाययोजना कराव्या लागत असत. परंतु आता ‘युरेथ्रोप्लास्टी’च्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे. ‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठीसुद्धा अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच मैथुन करण्यास अकार्यक्षम रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोष जवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर रुग्ण मैथुन करण्यास सक्षम होऊ शकतो.”

काही वेळा प्रोस्टेट कॅन्सरच्या ऑपरेशननंतर स्नायूंच्या शिथिलतेमुळे लघवी गळू लागते. आर्टिफिशियल स्फिंक्टर या उपकरणाद्वारे हे थांबवता येते. प्रोस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरपीनंतर काहीवेळा मूत्राशय व मलमार्ग यामध्ये एक अनैसर्गिक मार्ग तयार होतो. अशा रुग्णांचे मूत्र विसर्जन गुदद्वारावाटे होते. अशा रुग्णांसाठी युरेथ्रोप्लास्टीत उपाय आहेत, असेही डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.

‘युरोकुल’ची बांधिलकी’
युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत.