कोठा येथे दोनदिवसीय फगवा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ; आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव

अमरावती : मेळघाटातील आदिवासी समाजातील विविध परंपरा, त्यांची निसर्गपूरक जीवनशैली, त्यांची परंपरागत ज्ञानसंपदा या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या फगवा महोत्सवाचा शुभारंभ खासदार नवनीत कौर यांच्या हस्ते धारणी तालुक्यातील कोठा येथील ग्रामज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्र येथे आज झाला.

महोत्सवाला पुढील वर्षापासून अधिक व्यापक स्वरूप मिळावे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे खासदार श्रीमती राणा यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी डिसेंबरमधील अमरावती दौ-यात फगवा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महोत्सव आजपासून सुरू झाला. माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष निरुपमा देशपांडे, वेणूशिल्पी संस्थेचे सोहनकुमार कासदेकर, हरिसालचे सरपंच विजुभाऊ दाराशींबे, कोठा येथील बन्सीलाल धांडे, सुखदेव दाराशींबे, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, धारणीचे नायब तहसीलदार शिरीष वसावे आदी उपस्थित होते.

ढोल व बासरीचे मंजूळ संगीत, आदिवासी कलावंतांचे मनोहारी नृत्य, लहानज्येष्ठ सर्वांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद अशा वातावरणात महोत्सवाचा शुभारंभ झाला. खासदार श्रीमती राणा यांनीही आदिवासी बांधवांच्या समूह नृत्यात सहभागी होऊन त्यांचा उत्साह वाढवला.

खासदार श्रीमती राणा म्हणाल्या की, मेळघाटात होळी सणाचे महत्व मोठे आहे. येथील आदिम संस्कृतीचे दर्शन, महत्त्व देशभर पोहोचावे यासाठी महोत्सवाला व्यापक स्वरूप मिळावे.

राज्य शासनाकडून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. अर्थसंकल्पात अमरावती विभागासाठी, तसेच आदिवासी बांधवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागाला जोडण्यासाठी बिरसा मुंडा सडक योजनेसारख्या अनेक योजना राबविण्याचा निर्णय झाला, असेही त्यांनी सांगितले. श्री. भिलावेकर, श्रीमती देशपांडे यांचीही भाषण झाली. माजी राज्यमंत्री व आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत उद्या दि. 12 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता समारोप होईल.

महोत्सवात विविध संस्थांतर्फे बांबूपासून बनवलेल्या वस्तू, सेंद्रिय धान्य, नैसर्गिक रंग आदींच्या दालनांचा समावेश आहे. साद संस्थेतर्फे पालक, बीट, गाजर, पळसफुले यापासून नैसर्गिक रंग तयार करण्यात आले आहेत. जंगलातील वनस्पती, झुडुपापासूनही नैसर्गिक रंग तयार करणे शक्य आहे, असे साद संस्थेच्या सुरभी गजभिये यांनी सांगितले. कोठा येथील करण आचारे यांनी बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे दालनही लक्षवेधी ठरले आहे.

https://www.youtube.com/watch?v=zodY2hafWEU