महाविकासची दोन वर्षे ही तर दमलेल्या कुटुंबप्रमुखाची कहाणी – आम आदमी पार्टी

पुणे – माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे सांगत टीव्ही वर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोरोना काळात जीवाची भीती असल्याने रस्त्यावर उतरून प्रश्न विचारले नाहीत. पण आता जनता या कोरोना महामारीतून सावरत आहे पण त्याला सरकारची मजबूत साथ नाही. गेले सहा महिने महाविकास आघाडी व भाजप यांच्या आरोपांच्या नूरा कुस्तीलाही कंटाळली आहे अशी टीका आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले,  रोजगार, कोरोना उपचार, शैक्षणिक फी चा तगादा, वीजबिल सवलत, महागाई, गृहखाते अपयश, महिला अत्याचार या सर्वच आघाडीवर फारसे काहीही न करणारे म्हणजे दमलेल्या कुटुंब प्रमुखाची कहाणी झाली आहे. महास्वयम व  महाजॉब्स नावाने रोजगार भरतीची वेबसाईट असून त्यावर १९ लाख पेक्षा अधिक शिक्षित बेरोजगारांची नोंद आहे . खाजगी हॉस्पिटल मधील लुट रोखण्यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यात आप चे जितेंद्र भावे यांच्या आंदोलना नंतर  पाऊले उचलली. खाजगी शाळा फी सवलत ढिसाळ आदेशामुळे कोर्टात रखडली. घरकामगार महिला मदतीची घोषणा केली पण राज्यातील ३५ लाख घरकामगारांपैकी १ लाख महिलांनाही हा लाभ मिळाला नाही.

आरक्षणाचा खेळ खंडोबा चालूच आहे. महिला अत्याचाराबाबत ठोस पाऊले उचलली नाहीत. हॉस्पिटल अग्निकांड अजूनही घडत आहेत . वीजबिल सवलत हेही गाजर ठरले. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला या सर्वच घटकांसाठी आधार देऊ न शकलेला महाविकास सरकार हा दमलेला, थकलेला कुटुंब प्रमुख ठरला आहे.