दुबईतच का स्वप्नांतील घर विकत घेतायत श्रीमंत भारतीय? २०२२मध्ये ३५ हजार कोटींपेक्षा महागडी घरे घेतलीत विकत

Indians Bought Houses in Dubai: दुबईत घर खरेदी करणे हा श्रीमंत भारतीयांचा छंद बनत चालला आहे. बहुतेक श्रीमंत भारतीय दुबईमध्ये घरे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामध्ये मोठ्या उद्योगपतींपासून ते चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. येथील स्थानिक रिअल इस्टेट व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, श्रीमंत भारतीय लक्झरी जीवनशैलीसाठी दुबईमध्ये (Dubai) घरे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

रिअल इस्टेटच्या आकडेवारीनुसार, दुबईने गेल्या वर्षी भारतीयांना आलिशान घरांच्या विक्रीतून 16 अब्ज दिरहम म्हणजेच सुमारे 35 हजार 500 कोटी रुपये कमावले आहेत.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 

दुबई हे श्रीमंत भारतीयांचे डेस्टिनेशन बनत आहे
येथे अनेक आलिशान मॉल्स आणि गगनचुंबी इमारती आहेत, जे खूप लोकांना आकर्षित करतात. बुर्ज खलिफा (Burj Khalifa) हे नेहमीच लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. 2021 मध्ये, भारतीयांनी घर खरेदी करण्यासाठी सुमारे 9 अब्ज दिरहम खर्च केले होते. म्हणजेच 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये भारतीयांनी घर खरेदीसाठी जवळपास दुप्पट रक्कम खर्च केली आहे.

दुबईतील घर खरेदी करणाऱ्यांपैकी 40 टक्के भारतीय
आकडेवारीनुसार, दुबईत सुमारे 40 टक्के घर खरेदी करणारे भारतातील होते. दुबईत घरे विकत घेणारे बहुतेक लोक दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि पंजाबमधील होते. टाईम्य ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, दुबईमध्ये कार्यरत असलेल्या रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्मच्या सीईओचे म्हणणे आहे की, जागतिक भूमिका असलेले काही वरिष्ठ अधिकारी देखील दुबईतील मालमत्तांवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणाले की अनेक श्रीमंत भारतीय महागड्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहात आहेत.

दुबई हे आकर्षणाचे केंद्र का बनत आहे?
दुबईच्या रेंटल बाजारामध्ये कोविड महामारीच्या काळात सुमारे 30 टक्क्यांची घसरण झाली होती, परंतु आता ते 2015-16 च्या पातळीवर परतले आहेत. जेव्ही व्हेंचर्सचे सह-संस्थापक विशाल गोयल हे दुबईमध्ये घरे विकत घेतलेल्या भारतीयांमध्ये आहेत. गोयल सांगतात की, दुबईत राहिल्यामुळे मी कामाच्या निमित्ताने हैदराबाद, दुबई आणि लंडनला सहज प्रवास करतो. ते म्हणाले की दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरने ऑफर केलेली फिनटेक इकोसिस्टम अनेक तरुण भारतीय उद्योजकांना शहराकडे आकर्षित करते.

दुबईमध्ये घर खरेदी करण्याची किंमत किती आहे?
भारतीयांनी खरेदी केलेल्या घरांची सरासरी किंमत 3.6 कोटी ते 3.8 कोटी रुपये आहे. मासिक भाडे 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत आहे. स्थानिक रिअलटर्सचे म्हणणे आहे की, दुबईमधील मालमत्तांमधून सरासरी भाडे उत्पन्न सुमारे 4 टक्के ते 5 टक्के आहे. एकूणच, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्यासाठी दुबई हे एक आवडते ठिकाण बनत आहे. शहरात जागतिक दर्जाच्या सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय शाळाही येथे भारतीयांना आकर्षित करत आहेत.