गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातून जाईल अशी शक्यता आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्याआधी निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असतील. मात्र यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे. कोणीही गाफील राहू नका आणि गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

सर्वतोपरी लढाई लढू, पण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.