Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे

Uddhav Thackeray | भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो असा टोला उद्धव ठाकरें नी लगावला आहे. हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. भाजपाने १० वर्ष महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लुट करून गुजरातला घेऊन गेले आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिन ची सुरुवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप