उद्धव ठाकरे – चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही : फडणवीस

औरंगाबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीकाल  भेट घेतली. वृत्तानुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्याशी सुमारे 2 तास चर्चा केली. यामध्ये राष्ट्रीय राजकारणापासून राज्यांच्या हिताच्या रक्षणासाठी संयुक्त रणनीती बनवण्यापर्यंत, बिगरभाजप राज्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आदी मुद्द्यांसह २०२४ मध्ये बिगरकाँग्रेस तिसऱ्या आघाडीसोबत मोदींचा रथ रोखण्याची रणनीती आखण्याबाबत चर्चा झाली.

दरम्यान, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. कालच्या त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही, असं सांगतानाच यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

या सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. देशातील विविध राज्यात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कुठेही त्याचा परिणाम झाला नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.