माझे वडील का चोरताय?  तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं – ठाकरे 

Mumbai – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असा थेट चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.

सामान्यातून आता असामान्य घडवण्याची वेळ आली. चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू. त्यांना मी ताकद दिली ही माझी चूक झाली. राजकारणात जन्म दिला त्यांना गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातकी आईलाच गिळायला निघाले आहेत. निष्ठा कधीच विकली जाऊ शकत नाही. ज्यांनी जन्म दिला त्यांनाच संपवायला निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

सडलेली पानं आता गळून पडत आहेत. काही दिवसात नवीन पानं पुन्हा येतील, असं शब्दात बंडखोरांचा उल्लेख केला आणि सध्याची परिस्थिती बदलेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्यासोबत अनेक वरिष्ठ शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आशीर्वाद देत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.