उद्धव ठाकरेंची आता थेट नरेंद्र मोदींना विनंती; म्हणाले, आता तुम्हीच…

Mumbai – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरं न जाता स्वतःहून पदाचा राजीनामा दिला; त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा, अशी सूचनाही; सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा (Chief Justice Justice Dhananjay Chandrachud, Justice M. R. Shah, Justice Krishna Murari, Justice Hima Kohli and Justice P. S. Narasimha) यांच्या घटनापीठाने केली.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

देशाच्या आणि, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली.