‘अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू’

Mumbai – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले.

मुंबईतील गटनेत्यांच्या या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय परंपरेनुसार दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. तेव्हापासून महाराष्ट्रात आदिलशाह, निजामशाह असे अनेक जण आले आणि गेले. त्यातीलच एक हे अमित शाह आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.