सेना-भाजपा युतीसाठी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी; सेनेच्या अजून एका खासदाराचं स्पष्ट मत

नाशिक  – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदार भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे.

गोडसे पुढे म्हणाले की, नाशिक लोकसभेचा विचार केला या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक शहरातील तीन आमदार हे भाजपाचे आहे. तर ग्रामीण भागातील तीन आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. ते शिवसेनेविरोधात लढून निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल, हा प्रश्न उपस्थित होईल, अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली.

भाजपासोबतचा २५ वर्षांचा युतीचा अनुभव आणि महाविकास आघाडीतील अडीच वर्षांचा आघाडीचा अनुभव पाहता आपण युतीकडे जावं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन संवाद साधून मार्ग निघतो का हे पाहावं, असे मत अनेक खासदारांनी मांडली, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले.