आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले.

मुंबईतील गटनेत्यांच्या या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर (Amit Shah) जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.