तुम्हाला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या पाठिशी ठामपणे उभे होते – शीतल म्हात्रे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठामपणे हिंदूंच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत असे देखील संकेत दिले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला धुतल्यानंतर आता महाविकास आघातील तमाम नेते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत. यातच आता शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी राज ठाकरे यांना नकलाकार आणि सुपारीबाज म्हणून मनसे भाजपाची टीम सी असल्याचा घणाघात केला. तसेच राज ठाकरे भाजपाची सुपारी घेऊन वागत आहेत, असा आरोपही केला.

शितल म्हात्रे म्हणाल्या, आप ही भाजपाची बी टीम आहे असं म्हटलं जातं, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राने भाजपाची टीम सी असलेले प्रसिद्ध नकलाकार आणि सुपारीबाज अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं. हे भाषण कुठंतरी मराठी माणसाच्या मुळावर उठल्यासारखं दिसत होतं. भाजपाची सुपारी घेऊन कशा पद्धतीने वागावं हे खरोखर या अध्यक्षांना कळलं पाहिजे.

राज ठाकरे ईडीच्या नोटीसबद्दल बोलत होते. तुम्ही विसरत आहात की तुम्हाला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या पाठिशी ठामपणे उभे होते. असा करंटेपण करू नका. आज महाराष्ट्रातील मराठी माणसं, हिंदू माणसं एकत्र होत आहेत. महाराष्ट्र सरकारचं चांगलं काम चाललं आहे हे संपूर्ण जग बघतं आहे. अशावेळी हा करंटेपणा करून दुही वाढवू नका, असं शितल म्हात्रे यांनी म्हटलं.