Uddhav Thackeray : मुंबईत आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण घडला. त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या या एकत्र येण्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या विजयी मेळाव्याकडे लागलं होतं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर, आजपर्यंत वापर करून घेतला, आता आम्ही वापर करून फेकणार आहोत, अशी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज आणि मी अनुभव घेतला आहे, या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात? कोणत्या भाषेत बोलत होता? राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सर्वच उच्चशिक्षित आहे. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात सुरू केलं. की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.