‘विधाानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ’

Mumbai – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरं न जाता स्वतःहून पदाचा राजीनामा दिला; त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा, अशी सूचनाही; सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा (Chief Justice Justice Dhananjay Chandrachud, Justice M. R. Shah, Justice Krishna Murari, Justice Hima Kohli and Justice P. S. Narasimha) यांच्या घटनापीठाने केली.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि थेट विधानसभा अध्यक्षांनाच एकप्रकारे इशारा दिला आहे. आमच्याकडून पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकाल देताना इकडे काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा देतानाच त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.