उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार; शंभुराज देसाई यांची घोषणा

नागपूर :  दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे कालच राज्य सरकारने आदेश दिले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असल्याने आदित्य यांच्या अडचणी वाढल्याचे सांगण्यात येत असतानाच आज उद्धव ठाकरे यांची अडचण वाढवणारी बातमी समोर आली आहे.

उमेश कोल्हे प्रकरणी तपास करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन केले होते. या फोनची आता गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. आमदार रवी राणा यांच्या मागणीनंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी हे आदेश दिले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास सांगितलं होतं. खासदार नवनीत राणा आणि मीदेखील देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेलो होतो. राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही सांगितलं होतं. त्यांनी एनआयएकडे तपास सोपवला होता. दिल्लीवरुन एनआयएचं पथक आलं तेव्हा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हिंदुत्वाच्या बाजूने पोस्ट केल्याने भरचौकात हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं, असं अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी सांगितलं.

हे प्रकरण दाबण्याचं काम राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. एसआयटीच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी पोलीस आयुक्तांना केलेल्या फोनचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी यावेळी केली.