उद्धवजी ..PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण शांत का बसलात ? 

मुंबई : दसरा मेळाव्याची शिवसेना व शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त गर्दी कशी होईल या दृष्टीने उभय बाजूने प्रयत्न केले जात आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत शिंदे यांना लक्ष्य करण्यात आले, तर शिंदे गटाच्या चित्रफितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा हवाला देत शिवसेनेला टोला लगाविण्यात आला आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता मनसेचे नेते योगेश खैरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून उद्धव ठाकरेंना फैलावर घेतले आहे. उद्धवजी… उद्या शिवतिर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो  म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरं द्या….! असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांनी काही नेमके सवाल केले आहे.

ते  म्हणतात, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली ? PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात ? एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन – चार मतांसाठी हातमिळवणी का केली ? सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीच उदात्तीकरण का रोखलं नाही ? मस्जिदवरील भोंगे उतरले पाहिजे हा मा.बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले ? मा. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात ? अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केलीत ? आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं ?

साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार…. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम ‘हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे म्हणण्याचा आणि मा. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही ! असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.