उमेश कोल्हे निर्घृण खुनाचा तपास एनआयए कडे सोपवावा; शिवराय कुळकर्णी यांची मागणी

अमरावती – अमरावतीच्या अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे (Amit Medical Director Umesh Kolhe) यांचे निर्घृण खून प्रकरण नुपूर शर्मा (Nupur Sharma) वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा तपास एनआयए (NIA) ने करावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी केली आहे.

उमेश कोल्हे यांचा खुन लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणीच मोठा चायनिज चाकू (Chinese knives) त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा आहे. हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? उमेश कोल्हे यांचा मोबाईल सध्या पोलिसांजवळ आहे. त्यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का ? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे व कुठून फोन आले ? ते विशिष्ट समाजाच्या लोकांचे होते का , अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता हा तपास एनआयए ने ( नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी ) करावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. अमरावतीचे पोलीस निष्कर्षाप्रत पोहचले तरी हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय आहे. याची पाळेमुळे शोधण्याची आवश्यकता असल्याचे कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

उमेश कोल्हे आणि त्यांना आलेले मेसेजेस, कॉल्स याचा सिडीआर बारकाईने तपासला जावा. अमरावती संवेदनशील होऊ नये, पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये. यासाठी या प्रकरणाचा योग्य व कठोर तपास करून कारवाई व्हावी अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.