उमेश यादवची ४४ लाखांची फसवणूक, व्यवस्थापक मित्रानेच लावला चुना

Umesh Yadav Cheated: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज उमेश यादवसोबत फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मॅनेजरने नागपुरात जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली त्याची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उमेश यादव यांच्या तक्रारीवरून नागपूरचे रहिवासी शैलेश ठाकरे (shailesh Thackeray)यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे (३७) हा कोराडी येथील रहिवासी असून तो उमेशचा मित्र आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस अधिकाऱ्याने एफआयआरचा हवाला देत म्हटले आहे की, टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर उमेश यादवने बेरोजगार मित्र शैलेश ठाकरे याला १५ जुलै २०१५ रोजी व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. ठाकरे यांनी कालांतराने उमेश यादव यांचा विश्वास जिंकला. यानंतर तो उमेश यादवचे बँक खाते आणि प्राप्तिकरासह पैशांसंबंधीचे काम पाहू लागला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, उमेश यादवला नागपुरात जमीन विकत घ्यायची होती आणि त्याबाबत ठाकरे यांना सांगितले. ठाकरे यांनी ओसाड भागात एक प्लॉट पाहिला आणि उमेश यादव यांना सांगितले की, तो तुम्हाला 44 लाख रुपयांना मिळेल. ही रक्कम त्यांनी ठाकरे यांच्या खात्यात जमा केली. मात्र ठाकरे यांनी हा भूखंड त्यांच्या नावावर केला.

या फसवणुकीची माहिती उमेश यादव यांना समजताच त्यांनी ठाकरे यांना भूखंड त्यांच्या नावावर करण्याची मागणी केली, मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला. ही रक्कम उमेश यादव यांना परत करण्यासही ठाकरे यांनी नकार दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकारी म्हणाले, “उमेश यादव यांनी कोराडी येथे एफआयआर दाखल केला असून त्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.