नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? विखेंचा थेट सवाल 

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान,  नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन केले. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला  भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले असून मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जहरी टीका केली आहे.

मुंबईसह राज्याला असुरक्षित करणाऱ्या व्यक्तींसमवेत अर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला. नबाब मलिकांचे बॉम्ब स्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या अर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी कडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेवून शिवसेना राज्य करणार का?, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला.