रेल्वेचे थांबे पुर्ववत करा, पालकमंत्र्यांचे रेल्वेला पत्र

वर्धा : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाने बरेचसे निर्बंध कमी केले आहे. भारतीय रेल्वेने जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवर अद्यापही थांबे सुरू केले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील रेल्वेचे थांबे पुर्वीप्रमाणे नियमित करावे, यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी भारतीय रेल्वेला लेखी पत्रान्वये कळविले आहे.

वर्धा जिल्ह्यातून अनेक प्रवासी बाहेर जिल्ह्यात जात असतात. बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणावर प्रवासी जिल्ह्यात येतात. शासकीय व खाजगी कामानिमित्त नागपूर व आजुबाजूच्या जिल्ह्यातील प्रवाशांची ये जा सुरू असते. परंतु अद्यापही रेल्वे काही ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: सरकारी नोकरीसाठी ये जा करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.

रुग्ण कमी झाल्याने राज्य शासनाने बरेचसे निर्बंध कमी केले आहे. केंद्र शासनाने सुध्दा बरेचसे निर्बंध हटविले आहे. कोरोना नियमांचे पालन करत रेल्वेच्या बहुतांश फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र जिल्ह्यातील काही स्थानकांवर रेल्वे थांबविली जात नाही.

त्यात जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट तर नागपुर जिल्ह्यातील काटोल, नरखेड या थांब्यांचा समावेश आहे. प्रवाशांची होणारी अडचण पाहता कोरोना नियमांचे पालन करत या ठिकाणी रेल्वेचे थांबे नियमित करण्यात यावे, असे पत्र पालकमंत्री सुनिल केदार यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई येथील महाव्यवस्थापकांना नुकतेच पाठविले आहे.