आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, जिल्हा बँकेतील विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी

सिंधुदुर्ग – शिवसेना आणि नारायण राणे संघर्षात प्रतिष्ठेची झालेली जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गड जिंकत 19 पैकी आतापर्यंत 11 जागांवर भाजपा तर 8 जागांवर महाविकासआघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाचे पॅनल प्रमुख माजी आमदार राजन तेली यांचा पराभव झाला आहे. बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा देखील पराभव झाला. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याने ही निवडणूक गाजली. या प्रकरणी अद्यापही संशयित आरोपी आमदार नितेश राणे अद्यापही अज्ञातवासात आहेत.

दरम्यान, या विजयावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. राणे म्हणाले की, ही सत्ता माझी नाही तर भाजपची आहे. जिल्ह्यातील जनता आणि देवदेवता यांच्यामुळे सत्ता आली आहे. नितेश, निलेश राणे यांची मेहनत आणि त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे आमचा विजय झाला आहे. आम्ही अकलेचा वापर करून विजय मिळवला आहे. अकलेचा वापर करणाऱ्यांना देवदेवतांची साथ मिळाली आहे.

सिंधुदुर्गनंतर आता महाराष्ट्रातील सत्तेकडे पाहणार आहे. आता माझे लक्ष महाराष्ट्र सरकार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यांतील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दोन वर्षांनी होतील. या जिल्ह्यांत सर्व विजयी उमेदवार हे भाजपचेच असतील. चेहरा पाहवत नाही अशा लोकांना जनता लोकप्रतिनिधी ठेवणार नाही, असे राणेंनी म्हटले आहे.