प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे गेम असतं… प्रत्येक पोराचं अगदी सेम असतं!; ‘ढिंशक्याव’चा टिझर प्रदर्शित

मुंबई- लातूरचा पठ्ठ्या अहेमद देशमुख (Ahemad Deshmukh) आणि प्रथमेश परब (Prathmesh Parab) अभिनित बहुप्रतिक्षित ‘ढिंशक्याव’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे गेम असतं… प्रत्येक पोराचं अगदी सेम असतं!’, अशा भन्नाट कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा टिझर चाहत्यांचं लक्ष वेधताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यानंतर चित्रपटाची कथा जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. आता अखेर ढिंशक्यावचा टिझर प्रदर्शित झाला असून अनोखी प्रेमकहाणी अन् त्याला कॉमेडीचा तडाखा देण्यात आला असल्याचे टिझरवरून लक्षात येते.

ढिंशक्यावच्या टिझरमध्ये अभिनेता प्रथमेश परब तरण्याताठ्या मुलांना प्रेमाचे नव्हे प्रेम न करण्याचे धडे देताना दिसतोय. पण स्वत:च्या प्रेमाचे सूत जुळवण्यासाठी मात्र तो शक्य तितके प्रयत्न करतोय. मात्र त्याच्या प्रेमकहाणीत नवा सितारा अहेमद देशमुख ‘कबाब में हड्डी’ बनून मध्ये मध्ये पाय घालताना दिसतोय. प्रथमेश परब, अहेमद देशमुख आणि मेघा शिंदे यांच्या लव्ह ट्रायँगलमध्ये अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि पोलिस इंस्पेक्टरच्या भूमिकेत असलेला अभिनेता संदीप पाठक हे ‘लोहे की दिवार’प्रमाणे उभे असल्याचे टिझरवरून लक्षात येते. त्यामुळे नेमकी कोणाच्या प्रेमकहाणीची नौका समुद्रात उतरण्यात यशस्वी होते? आणि कोण किनाऱ्यावरच राहाते?, हे गुपित १० फेब्रुवारी २०२३ ला समोर येईल.

दरम्यान दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी कामगिरी या चित्रपटासाठी बजावली आहे. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांच्या खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि स्वराज्य कनिका जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर त्यांचा हा चौथा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर चित्रपटात अहेमद देशमुख सोबत प्रथमेश परब, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. तर नवोदित अभिनेता अहेमद देशमुख ‘ढिशक्यांव’ चित्रपटातून स्वकर्तुत्वाने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर उत्सुकता लागली आहे ती सिनेमा प्रदर्शित होण्याची. चित्रपटात हे सर्व कलाकार मिळून काय धुडगूस घालणार आहेत? याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. आणि त्यासाठी जास्त विलंब न करता येत्या १० फेब्रुवारी २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचा धमाकेदार टिझर पाहता चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल, यात वादच नाही.