‘ऐकण्यापुरती राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होईल, मात्र त्याचे मतामध्ये परिवर्तन होणार नाही’ 

संगमनेर –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असून बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेसह सत्ताधारी लक्ष ठेवून आहेत.

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय.

राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे आज कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेची विरोधकांनी चांगलीच धास्ती घेतली असून महाविकास आघाडीकडून सातत्याने राज यांच्यावर टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, ऐकण्यापुरती सभेला गर्दी होईल, मात्र त्याचे मतामध्ये परिवर्तन होणार नाही. राजकरण हे विकासाचे असले पाहिजे तर धर्म हा व्यक्तिगत असला पाहिजे. सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही. मात्र, ही जबाबदारी जो नेता म्हणून मिरवतो त्याचीसुद्धा असल्याचे थोरात म्हणाले.