भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा जाहीरनामा प्रसिध्द; जाणून घ्या नेमकी काय दिली आहेत आश्वासने 

पुणे : शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा, राजेंद्रनगर आणि साने गुरूजी या महापालिका वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय, शहरातील पार्किंग व्यवस्था इत्यादी, मुद्दे उपस्थितीत करत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (BJP candidate Hemant Rasane) यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी आता प्रचाराला मोजकेच दिवस शिल्लक असतांना रासने यांनी हा अतिशय सुरेख असा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

देशभरात विख्यात असलेल्या पुण्याचे मर्मस्थान कसबा असून ही पुण्याची प्राचीन ओळख आहे. प्राचीन वारसास्थळे आणि पुण्याच्या बदलत्या इतिहासाचा साक्षीदार कसबा असून हा वारसा अभिमानाने जोपासणे आणि नव्या शहरी संस्कृतीच्या सर्व सुविधाही सामावून घेण्यासाठी कसबा सज्ज असल्याचे सांगत हेमंत रासने यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कसबा मतदार संघातील अनेक मुद्द्यांचा त्यांनी यात समावेश केला आहे.

पुण्यदशम् बससेवेचा विस्तार, मतदारसंघातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्रतीक्षालय व स्वच्छतागृह, महानगरपालिका रूग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा, चोख घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, लाईट हाऊस प्रकल्पांची संख्या, भाजीवाले, पथारीवाले, फेरीवाले यांसारख्या अल्प उत्पन्न गटातील घटकांना व्यावसायिक सुरक्षा, महिलांकरीता स्वयंरोजगार, असे अनेक प्रश्न सोडवण्याचे हेमंत रासने यांनी मतदारांसाठी आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचं मोठं आवाहन असणार आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे  मागील सात ते आठ दिवसापासून भाजपचे अनेक मंत्री, आमदार, नगरसेवक पुण्यात ठाम मांडून बसले आहेत. भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शिवसेनेचे नेते देखील या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करीत आहेत. त्यामुळे येत्या ०२ मार्चला मतदार कुणाच्या पारड्यात मतदार संघ टाकणार? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.