मंत्री संदीपान भूमरेंच्या कार्यक्रमाकडे लोकांनी फिरवली पाठ;  शंभर दीडशेच्या वर लोकंही नव्हते

संभाजीनगर – संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पैठणचे आमदार, मंत्री संदिपान भुमरेंचीही (Sandipan Bhumare) उपस्थिती होती. आता नवं-नवं मंत्रिपद मिळालेल्या आमदारांच्या कार्यक्रमाला  गर्दी होणं अपेक्षित होतं. पण पैठणमधल्या या कार्यक्रमात तर शंभर दीडशेच्या वर लोकंही नव्हते.

नेमकं काय झालं ?

पैठणमध्ये संदिपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालंय. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत एका रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं. आपल्या मतदार संघातील आमदाराला मंत्रिपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येणं अपेक्षित आहे. किमान हजारेक जणांची गर्दी तरी या कार्यक्रमाला अपेक्षित होती. मात्र पैठणमधलं चित्र काहीसं आश्चर्यकारक आणि शिंदे गटाला विचार करायला लावणारं ठरलं. या कार्यक्रमात मोजून शंभर ते दीडशे लोक उपस्थित होते. TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.