बाळाचे वजन वाढवण्यासाठी बनवा ‘कणकेचा शिरा’

पुणे – जन्म झाल्यानंतर मुलांचं संपूर्ण पालन-पोषण हे त्यांच्या खानपानाच्या सवयी आणि त्यातून मिळणारे पोषण यावर अवलंबून असते . सहा महिन्यांपर्यंत बालक आईच्या दुधावरच अवलंबून असते . त्यानंतर हळूहळू काही पदार्थांची त्यात भर घालायला सुरुवात केली जाते . बाळाचे उष्टावण केल्यानंतर हळू काही खीर, शिरा , खिचडी असे पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये सुरू केले तर हमखास त्यांचे वजन चांगले भरेल आणि बाळ गुटगुटीत दिसते .

आता सर्वप्रथम पाहूयात कणकेचा (गव्हाचे पीठ) शिरा कसा बनवायचा . कणकेचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – तूप , गुळाची पावडर (गुळ किसलेला) , कणिक (गव्हाचे पीठ) , ड्रायफ्रूट पावडर , दूध , पाणी , जायफळ

कणकेचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन मोठे चमचे तूप घ्या . त्यावर ड्रायफ्रूटची पूड हलके भाजून घ्या . ही घरामध्ये आठवडाभरासाठी बनवून ठेवली तर पदार्थ बनवणे सोपे जाते . यामध्ये अक्रोड , बदाम , काजू यांचा समावेश हमखास असावा . ड्रायफ्रूट हलके भाजून घेतल्यानंतर त्यावर बालकाच्या वयानुसार अंदाज घेऊन दोन मोठे चमचे कणीक (गव्हाचे पीठ) घालून हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या . त्यानंतर पूर्ण एक ग्लास भरून पाणी यामध्ये घालून पातळ असे शिजवून घ्या .

हे मिश्रण चांगले खदखदून आल्यानंतर घट्ट होऊ न देता त्यामध्ये अर्धा कप दुध घाला . हे मिश्रण सातत्याने हलवत राहा . शिरा हा घट्ट करायचा नाहीये , हा शिरा पातळच राहिला पाहिजे लहान मुलांना कोणताही शिरा किंवा कोणताही पदार्थ अति घट्ट स्वरूपात देऊ नका . त्यानंतर यामध्ये गुळ पावडर आणि थोडेसे जायफळ किसून घातले तर मुलांना छान झोप लागते. हे सर्व मिश्रण छान हलवत राहा आणि इडलीचे बॅटर जसे असते तेवढे पातळ ठेवून हलके कोमट असतानाच मुलांना खायला घाला . कणकेचा शिरा हा बालकांचे वजन वाढवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे . त्याचा परिणाम बळावर अगदी आठवड्याभरात देखील दिसून येतो .