शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरण : आरोपींनी खोलीतील सीसीटीव्ही बंद करून अंधारात सोडविल्या उतरपत्रिका

मुंबई / नागपूर : शिक्षक पात्रता परिक्षेच्या निकालात फेरफार केलेल्या तीन आरोपींनी कोऱ्या उत्तरपत्रिका मागवून घेतल्या. खोलीतील सीसीटीव्ही बंद करून त्या सोडवल्या. गुणांमध्ये फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्याकरिता गैरमार्गाचा वापर केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

शिक्षक पात्रता परिक्षेच्या (टीईटी) निकालात फेरफार करुन गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर काय कारवाई केली, असा प्रश्न आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १३ आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार यांचा देखील यात समावेश आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

शिक्षक पात्रता परिक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणी जी. ए. सॉफटवेअरचे संचालक आणि मुख्य एजंट व दोन शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून ४ कोटी ६८ लाख जप्त केल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी परिषदेत दिली.