‘चित्राजी तुम्हाला संजय आठवतोय का?’, उर्फी जावेदच्या प्रत्युत्तराने चित्रा वाघ यांची बोलती बंद

Urfi Javed & Chitra Wagh Crisis: मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील सोशल मीडिया वॉर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर नंगानाच करणाऱ्या उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिच्यावर कारवाईची मागणी केली. यावर प्रत्युत्तर देताना उर्फीनेही चित्रा वाघ यांना त्यांची संपत्ती उघड करण्यास सांगत आव्हान दिले. यानंतर आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी उर्फी समोर दिसताच तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली. आता यावरही उर्फीने चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे गटातील नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांची आठवण करून देत उर्फीने चित्रा वाघ यांची बोलती बंद केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम आणि ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘ही तीच महिला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजय राठोडच्या अटकेसाठी ओरडत होत्या. त्यानंतर लाच घेतल्यामुळे त्यांचा पती निशाण्यावर आला. पतीला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय आणि चित्राजी एकमेकांचे चांगले मित्र बनले. मीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आम्ही दोघीसुद्धा चांगल्या मैत्रिणी होऊ’, असा उपरोधिक टोला तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लगावला.

ट्विटरवरही तिने चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्याविषयी ट्विट केलं. ‘चित्रा वाघ यांची खास मैत्रीण बनण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चित्राजी तुम्हाला संजय आठवतोय का? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांच्या ज्या चुकांविरोधात तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना हल्लाबोल केला होता, त्या सर्व तुम्ही आता विसरला आहात’, असं तिने म्हटलंय.

 

शिवसेना नेते संजय राठोड हे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र सरकारमध्ये वनमंत्री होते. 2021 मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूचा आरोप त्यांच्यावर होता. पूजाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजपने हे प्रकरण उचलून धरत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.