अमेरिकेने चीनचा स्पाय बलून पाडला, F-22 लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागले

अमेरिकेच्या लष्करानं काल हेरगिरीच्या संशयावरून अवकाशात आढळलेला चिनी बलून उद्ध्वस्त केला. संपूर्ण अमेरिकेत विविध ठिकाणी गेल्या आठवड्याभरात हा बलून दिसून आला होता. तो हेरगिरीसाठी पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

Spy Balloon : अमेरिकेच्या लष्करानं काल हेरगिरीच्या संशयावरून अवकाशात आढळलेला चिनी बलून उद्ध्वस्त केला. संपूर्ण अमेरिकेत विविध ठिकाणी गेल्या आठवड्याभरात हा बलून दिसून आला होता. तो हेरगिरीसाठी पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यानं तो नष्ट करण्याबाबत जनतेकडून दबाव आणला जात होता. त्यामुळं अमेरिकेच्या लष्करी विमानांनी अटलांटिक महासागरावर संचार करत असलेल्या या बलूनला लक्ष्य करत तो नष्ट केला.

यासाठी तीन विमानतळ आणि दक्षिण कॅरोलिना किनार्‍यावरील हवाई क्षेत्रातील उड्डाणं बंद करण्यात आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना गेल्या आठवड्यात संपूर्ण यूएसमध्ये दिसल्यापासून ते खाली पाडण्यासाठी तीव्र दबावाचा सामना करावा लागला. या स्पाय बलूनमुळं अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला असून, अमेरिकेचे सचिव अँटनी ब्लिंकन यांनी बीजिंग दौरा रद्द केला होता. दरम्यान, शुक्रवारी लॅटिन अमेरिकेत दुसरा एक चिनी बलूनही आढळून आल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर, चीननं या घटनेबद्दल खेद व्यक्त करत, आपण कोणत्याही सार्वभौम देशाच्या भूभागाचे आणि हवाई क्षेत्राचे उल्लंघन केलं नसल्याचं म्हटलं आहे.