पुढील खरीप हंगामात सोयाबिनचे घरचे बियाणे वापरा…

वर्धा :- सद्यस्थितीत शेतक-यांची आपल्या सोयाबीन पिकाची कापणी केली असून सोयाबिन साठवणूक केली आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरता येते त्यामुळे यावर्षी सोयाबिन पिकाचे जेवढेही चांगले बियाणे उत्पादित झाले आहे तेवढे जतन करुन पुढील हंगामाकरीता साठवून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोयाबिन बियाणे साठवणूक करतांना घ्यावयाची काळजी पुढील प्रमाणे, वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे जूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामुध्ये साधारणपणे 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे. बियाणे घरी साठवणूक करतेवेळी बियाण्याची थप्पी 7 पोत्यापेक्षा उंच जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करु नये.

बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळया किंवा जुने पोते अंथरुण त्यावर बियाण्याची साठवणूक करावी. पोते सिलिंग करण्यापुर्वी बियाण्याची प्रत चांगली असल्याची खात्री करुन घ्यावी.

प्रत्येक पोते तपासणी करुन ज्या पोत्यामध्ये काडीकचरा, दगडमाती, काळपट व ओलसर बियाणे आढळून आल्यास पोत्याचे सिलींग करु नये. शेतक-यांना स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबिनची 3 वेळा उगवणक्षमता चाचणी करुनच पेरणी करावी. बियाणे साठवणूक करण्यात येत असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी गळणार नाही, याची खात्री करुनच बियाण्याची साठवण करावी.

तसेच अवकाळी येणा-या वादळी पावसापासून बियाणे खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे व खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करु नये. सोयाबिन बियाण्याचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी असे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी कळविले आहे.