पेट्रोल पंपावर पेट्रोल, इंधन घेण्यासाठी लसीकरण अनिवार्य

लातूर :- जिल्ह्यातील पेट्रोल पंप मालक, स्वस्त धान्य दुकानदार, खाजगी बस वाहतूकदारांनी आपआपल्या आस्थापनेवरील कामगारांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले आहे.

आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रोन व्हेरीयंटच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात चिंता निर्माण झाली असून या व्हेरीयंटचा प्रसार पूर्वीच्या विषाणूपेक्षा ५०० पटीने अधिक होत असल्याचे आफ्रिकन देशांमध्ये निदर्शनास आले असल्याने पेट्रोल पंप मालक, चालक, खाजगी बस वाहतूक, स्वस्त धान्य दुकानदार यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकरी विजय भोय, जिल्ह्यातील पेट्रोल मालक, स्वस्त धान्य दुकानदार, खाजगी बस वाहतूक मालक यांची उपस्थिती होती.

स्वस्त धान्य दुकानदार

प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे बैठकीत बोलतांना म्हणाले की, स्वस्त धान्य दुकारांनी आपण व आपल्या कुटुंबाचे लसीकरण करून घ्यावे. तसेच लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र हेल्प क्रमांक 9013151515 या क्रमांकावरुन डाऊनलोड करून घ्यावे. स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन करावे व त्याची जनजागृती करावी. स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक 5 डिसेंबर नंतर लसीकरणाचे पुरावे सादर केल्याशिवाय धान्य ग्राहकाना देण्यात येवू नये. तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी आपआपल्या गावात नागरिकांनी लसीकरण करून घेण्याबाबत प्रवृत्त करावे. स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वतःच्या कुटूंबाचे 100 टक्के लसीकरण घेण्याचा प्रयत्न करावा. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपआपल्या दुकानाबाहेर फलकावर लसीकरण झाल्याशिवाय धान्य उपलब्ध होणार नाही, या आशयाचे फलक लावावेत. नागरिकांनी व स्वस्त धान्य दुकानदारांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा.

पेट्रोल पंप मालक

पेट्रोल पंप मालक यांनी त्यांच्या पेट्रोल पपांवर काम करणाऱ्या कामगारांचे सेवकाचे स्वतः सह सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच पेट्रोल पंप मालक चालकांनी पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात लसीकरण करुन घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय ग्राहकांना इंधन मिळणार नाही, अशा आशयाचे फलकही लावण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिले. खाजगी बस मालक खाजगी बस मालकांनी प्रवाशांनी लसीकरण करुन घेतल्याशिवाय त्यांना तिकिटे देवू नयेत. त्याबाबतचेही फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. व तिकिटे बुकींग झाल्यानंतर, त्यांच्या मोबाईलवर टिकिटे कन्फरर्मेशनसाठी जो संदेश जातो त्या संदेशासोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचेही प्रवाशांना कळविण्यात यावेत. तसेच मागील 15 दिवसांमध्ये इतर ठिकाणाहून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनीही आपली आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मास्क, सॅनिटाझर , सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. व आपल्या कुटूंबाची काळजी घेण्याच्या दृष्टीने सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.