काँग्रेसशी युतीवरून वडेट्टीवारांचं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर, युतीबाबत वडेट्टीवार म्हणाले…

भंडारा – गेल्या काही दिवसापासून पाच राज्याच्या निवडणूकीच्या (Election 2022) तोफा वाजत आहे. शिवसेना इतर पक्षांचा आश्रय घेवून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कोणताही मोठा पक्ष शिवसेनेला सोबत घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जरी बाहेरील राज्यातील असल्या तरी त्यांनी महाराष्ट्रातील वातावरणही तापलं आहे.

इतर राज्यातही काँग्रेसशी युती व्हावी असे खासदार संजय राऊतांकडून वारंवार बोललं जातंय. मात्र राऊत यांच्या केविलवाण्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसल्याचे दिसत आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर नैराश्यात गेलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्यात काँग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, राऊत यांनी केलेल्या या हल्ल्याला आता कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल. येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा द्यायच्या, असा खोचक टोला वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

गोव्यात कॉंग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या संजय राऊत यांच्या या टीकेचा देखील वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला. ते भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. संजय राऊत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे वड्डेट्टीवार यावेळी म्हणाले.