मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे – अजित पवार

मुंबई – वॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली पाहिजे असे बोलत आहे परंतु राज्यसरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केल्याची राज्यसरकारची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी स्पष्ट केली.

आज जनता दरबार (Janata Darbar) उपक्रमास उपस्थित राहिले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. हजार – अकराशे कोटी रुपयांची सीएनजीतून (CNG) जबाबदारी उचलली आणि २४०० म्हणजे साडेतीन हजार कोटी रुपयांचा महसूल सोडून जनतेला दिलासा दिला असेही अजित पवार म्हणाले. २१ मे २०२२ रोजी पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात कपात करण्यात आली होती त्यातून केंद्रसरकारने आणि राज्यसरकारने काय केले यावरून आरोप – प्रत्यारोप झाले. मात्र राज्यसरकारने जे काही करणं शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला असेही अजित पवार यांनी सांगितले.

आता पेट्रोल – डिझेलचा (Petrol – Diesel) निर्णय झाला त्यावेळी केंद्रसरकारने यामध्ये साधारण ८ रुपये पेट्रोल आणि दोन रुपये डिझेलची कपात केली. वन नेशन वन टॅक्स यापध्दतीची परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे तसं पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत राज्यांना स्वतः चं राज्य चालवण्याकरता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निधी तर लागतच असतो. कुठला टॅक्स, कशावर किती असावा तो निर्णय राज्यांचा असतो हेही अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे एक्साईज कलेक्शन डिझेलचे २०१७ – १८ मध्ये ३३ हजार ४७९ कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला टॅक्सच्या रुपाने दिले. २०१८ – १९ मध्ये ३५ हजार २८२ कोटी दिले. २०१९-२० मध्ये ३७ हजार ३४९ कोटी रुपये दिले. २०२०-२१ मध्ये ३० हजार ४३२ कोटी रुपये दिले. यामध्ये २०१७-१८ मध्ये फक्त ४२७ कोटी, २०१८-१९ मध्ये ४४० कोटी रुपये, २०१९ – २० मध्ये ४३५ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये ३८३ कोटी रुपये केंद्राकडून परत मिळाले. तर पेट्रोलचे एक्साईज कलेक्शन २०१७-१८ मध्ये १४ हजार ९२० कोटी रुपये त्यापैकी १२९ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये १५ हजार ६४३ कोटी पैकी १३९ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये १६ हजार १३४ कोटी पैकी १४७ कोटी रुपये, २०२० – २१ मध्ये १४ हजार ३२ कोटी पैकी १३८ कोटी रुपये मिळाले हेही अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रसरकार वेगवेगळे टॅक्स लावतात त्यामध्ये पेट्रोलमध्ये १.४० पैसे जमा करतात त्यात ५९ टक्के रक्कम केंद्राला व ४१ टक्के राज्याला मिळते ही रक्कम तुटपुंजी आहे असेही अजित पवार म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपाला आकडेवारी देत जोरदार प्रत्युत्तर दिले.