राहुल कलाटे यांचं पारडं जड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड बिथरले आहेत – चव्हाण

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयदेव गायकवाड (Jaydev Gaikwad) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या तरी ‘सेल’चे अध्यक्ष आहेत. चिंचवड विधानसभा निवडणुकीत (Chinchwad Bypoll Election) वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. राहुल कलाटे यांचं पारडं जड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड बिथरले आहेत. आपली निष्ठा पवारांच्या (Sharad Pawar) चरणी किती आहे?? हे दाखवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण (Kisan Chavan) यांनी केली आहे.

ते म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी फुले – आंबेडकरी चळवळीला गती देण्याचे, दिशा देण्याचे काम केलय. जयदेव गायकवाड विसरले असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. बाळासाहेब आंबेडकर यांना सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पळाले आणि म्हणून ते आमदार झाले.

त्यामुळे आपली पवार निष्ठा दाखवण्यासाठी व जातीच्या सेलच्या माध्यमातून अडगळीत पडल्यामुळे त्यांची धडपड सुरू आहे. व्यक्ती स्वार्थासाठी त्यांनी भारिप बहुजन महासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली होती, त्याचा आंबेडकरी चळवळीला किती उपयोग झाला ?त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलतांना नीट बोलायचं अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. असंही ते म्हणाले.