जाणून घ्या खरंच वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती होणार आहे का ?

मुंबई – वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युतीसंबंधी  सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्यावर बोलणी झाली आहेत की, आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार, हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.