‘३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहेत’

तुळजापुर – गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत अशी टीका युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Youth Sena Secretary Varun Sardesai) यांनी मनसे-भाजपा-शिंदे गट संभाव्य युतीवर केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ लढणार नाही तर जिंकणार आहोत असा विश्वास युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले काम केले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या दर्जाला शोभेल असं काम आदित्य ठाकरेंनी केले. मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतायेत. आता जरी आमचं सरकार नसलं तरी लोक हक्काने आदित्य ठाकरेंकडे प्रश्न घेऊन येत आहेत. तेदेखील मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे नेतृत्व जरी उद्धव ठाकरेंचे असले तरी आदित्य ठाकरेंचा चेहरा शिवसेनेसाठी १०० टक्के आश्वासक आहे. असंही वरुण सरदेसाईंनी म्हटलं.