वसंत मोरे आज राज ठाकरेंना भेटणार; नाराजी दूर होणार ?

पुणे – मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोरे यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी पायघड्या घातल्या असताना आता आज वसंत मोरे यांना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुबंईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.