वसंतोत्सव २०२३ पुरस्कार शुभदा पराडकर, डॉ. शुभदा कुलकर्णी व कार्तिकस्वामी दहिफळे यांना जाहीर

पुणे : ‘वसंतोत्सव’ संगीत महोत्सवांतर्गत दिला जाणारा ‘वसंतोत्सव पुरस्कार’ (Vasantotsav Award) यंदा ग्वाल्हेर-आग्रा परंपरेतील ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी शुभदा पराडकर (Shubda Paradkar), संगीत संशोधिका व लेखिका डॉ. शुभदा कुलकर्णी (Dr. Shubhada Kulkarni) आणि युवा तबलावादक कार्तिकस्वामी दहिफळे (Kartikswamy Dahiphale) यांना जाहीर झाला आहे. शुक्रवार २० जानेवारी ते रविवार २२ जानेवारी दरम्यान कोथरूड (Kothrud) येथील म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी आयोजित वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२० जानेवारी ) हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ज्येष्ठ गायक स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान’तर्फे ‘वसंतोत्सव’ संगीत महोत्सवात दर वर्षी तीन पुरस्कार दिले जातात. संगीत क्षेत्रात विद्यादान करणारे गुरुजन, संशोधन व लेखन करणारे विद्यावंत व एक उदयोन्मुख कलाकार अशा तीन व्यक्तींना हा प्रदान केला जातो.

यंदा पुरस्काराचे हे ९ वे वर्ष असून, संगीत शिक्षक व संशोधक यांना मानपत्र व रोख ५१,००० तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २५,००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.