महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला – खा. सुप्रिया सुळे

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलविण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज असून गरज पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका अशी खोचक टिपण्णी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील स प महाविधालय, टिळक रोड येथे आयोजित आंदोलनात सुप्रियाताई सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीपुढे न झुकण्याची राहिली आहे, परंतु सध्याच्या ईडी सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीच संस्कृती उदयास येत आहे असेही सुप्रियाताई म्हणाल्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. घोषणाबाजी करुन त्यांनी आसमंत दणाणून सोडला.

या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रात साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर खोके संस्कृतीचे पाईक असणाऱ्या ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे.

सदर आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपरोधिक पध्दतीने ढोल ,ताशे व नगारे वाजवून पुढील काळात राज्यातील मोठ मोठे उद्योग रोजगार जर असेच परराज्यात गेले तर आम्हाला फक्त दहीहंडी व इतर सभा समारंभा मध्ये सामील होवून ढोल वाजवणे एवढेच काम शिल्लक राहणार आहे त्याची आम्ही आतापासूनच तयारी सुरू केली आहे अशी उदिग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

या सदर आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख सौ मृणालिनी वाणी,सौ अश्विनी कदम,दीपक जगताप,विक्रम जाधव,विशाल तांबे,संतोष नांगरे,नाना नलावडे , काका चव्हाण वैष्णवी सातव,रत्ना नाईक,अश्विनी भागवत ,मनीषा होले,रोहन पायगुडे , फईम शेख व इतर कार्यकर्ते मोठेया संख्येने उपस्थित होते.