पुणे कॉंग्रेसमध्ये धुसफूस; काँग्रेस भवनातील बैठकीमध्येच दोन माजी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक 

Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कसबा मतदार संघात भाजपने हेमंत रासने यांना मैदानात उतरवले असून महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. प्रचारात देखील चांगलीच आघाडी घेतली आहे.  एका बाजूला रासने यांना महायुतीमधील मित्रपक्षांची भक्कम साथ मिळत असताना दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसमध्येच धुसफूस असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रविवारी शाब्दिक चकमक झाली.

या वृत्तानुसार, काँग्रेस भवनामध्ये बोलाविलेल्या बैठकीमध्येच दोन माजी नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांसमोर एकमेकांची उणीदुणी काढली. महाविकास आघाडीच्या सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यापूर्वीच नेत्यांमधील या आवेशाने काँग्रेसच्या कार्यकत्यांची मात्र पंचाईत झाली. कसबा पेठेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला जाणार होता. या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेस भवनमध्ये दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला कसब्यातील काँग्रेसचे बरेच वरिष्ठ नेते उपस्थित होते. प्रदेश पातळीवरील काही ज्येष्ठ पदाधिकारी या वेळी हजर होते. मेळाव्याची तयारी आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना अचानक दोन वरिष्ठ नेत्यांचा एकमेकांविरोधात आवाज चढला आणि त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. या दोन नेत्यांमधील हा वाद मिटविण्यासाठी अखेर काही पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली.

या वादाचे पडसाद सायंकाळच्या मेळाव्यापर्यंत उमटत होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी चेष्टामस्करीतून वाद झाल्याची सारवासारव नंतर केली असली, तरी काही नेत्यांनी निवडणुकीत ‘अशा घटना’ अधूनमधून होणारच, असा दावा करून ‘घरात भांड्याला भांडे लागतेच; तसेच पक्षात अधूनमधून होत असते,’ असा खुलासा केला.