छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर झळकणार, विकी कौशल मुख्य भूमिकेत!

Mumbai- बॉलीवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. त्याचा ‘उरी’ सिनेमा असो वा ‘सरदार उधम’ प्रत्येक भूमिकेत तो खरा उतरला आहे. आता हाच विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची भूमिका साकारणार असल्याचे समजत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) करणार असून त्यांनी विकी कौशलला या ऐतिहासिक चित्रपटासाठी साईन केले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप अभिनेत्याकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘बॉलिवूड हंगामा’नुसार, लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात विकी शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून त्याची पटकथा लिहिली गेली आहे. अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला (Vicky Kaushal In Sambhaji Maharaj Role) आहे. या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.

याआधी देखील विकी कौशल ऐतिहासिक भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. ‘तख्त’ आणि ‘द अमर अश्वत्थामा’ या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्याची निवड देखील झाली होती. परंतु, काही कारणांनी हे चित्रपट बंद पडले होते. मात्र, आता विकी या नव्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज साकारणार असल्याचे समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर विकी देखील मोठ्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारणार आहे. अशात विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत चाहत्यांची मने जिंकतो की नाही?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.