चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतला विजय हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा पूर्वरंग आहे – मोदी

नवी दिल्ली – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं चार राज्यांत आपली सत्ता कायम राखली तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवला. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षानं सलग दुसऱ्यांदा सत्ता कायम राखत ऐतिहासिक कामगिरी केली. राज्यात 403 पैकी 255 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपाचा मित्र पक्ष अपना दलाला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या.

दरम्यान, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतला विजय हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा पूर्वरंग आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर ते काल नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. हे निकाल भाजपा सरकारच्या कार्यकुशलतेचं आणि गरीबाभिमुख कार्यप्रणालीचं निदर्शक आहेत असं पंतप्रधान म्हणाले. सुशासन आणि योजनांची अंमलबजावणी याचं महत्त्व भाजपा जाणून आहे आणि त्याच दृष्टीनं आमची वाटचाल सुरू आहे असं मोदी यांनी सांगितलं.