Vijay Wadettiwar | मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर टिकास्त्र डागले आहे. त्याचबरोबर होर्डींग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? असा संतप्त सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई येथील गांधी भवन काँग्रेस पक्ष कार्यालयात आज विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, आज मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात २४ वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहूल गांधी यांची मोदींना भिती वाटते. महाविकास आघाडी 35 जाग जिंकणार आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतली पण कांदा प्रश्नावर ब्र सुद्धा काढला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे.
होर्डींग दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि सरकार जबाबदार आहे. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती काल गेली.आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचे फोटो कोणासोबत असू शकतात त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे. पण जनता आता भाजपाला ओळखून आहे. या सगळ्या घटनेची उचस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमच्याकडून केली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.