‘ओबीसींचे आरक्षण जाण्यास विजय वडेट्टीवार यांचा आडमुठेपणा कारणीभूत’

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याला राज्य सरकारची उदासीनता आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची आडमुठेपणा कारणीभूत आहे. त्याबरोबरच राज्य मागासवर्ग आयोगाचा दर्जाही यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे. त्यामुळे बोगस सदस्यांचा भरणा असलेला राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बरखास्त करावा, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेला मागासवर्ग आयोग सक्षम नसल्याची भुमिका मांडत ढोणे यांनी अनेक आंदोलन केली आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळून लावत ओबीसींचे राजकीय आरक्षण नाकारले आहे. यासंबंधाने भुमिका मांडताना ढोणे म्हणाले की, पुर्वीच्या भाजप सरकारने व विद्यमान महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे म्हणून गांभीर्यपुर्वक प्रयत्न केले नाहीत. न्यायालयाचे फटकारे बसल्यानंतर हे सरकार जागे झाले. मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेची जबाबदारी असलेल्या मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हितासाठी कृतीशील पावले न टाकता फक्त स्वार्थी राजकारण केले.

एकतर उशीराने आयोगाची स्थापना केली. त्यात पात्रता नसणाऱ्या कार्यकर्त्यांचा भरणा केला. गेली दोन वर्षे वडेट्टीवार यांचे कार्यकर्ते म्हणून वावर असलेले लक्ष्मण हाके हे बोगस प्राध्यापक असूनही चमकोगिरी करत आहेत. त्यांनी खोटी माहिती सरकारला दिली आहे. तरीही वडेट्टीवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हाके यांची नियुक्ती केली आहे. बबनराव तायवाडे हे समाजशास्रज्ञ म्हणून आयोगावर नेमलेले आहेत. त्यांचा आणि समाजशास्राचा काहीएक संबंध नाही. असेच इतरही बोगस सदस्य आयोगावर आहेत. याबाबत तक्रारी केल्यातरी शासन दाद द्यायला तयार नाही. बोगस सदस्यांना वडेट्टीवार यांचे संरक्षण आहे. त्यामुळे पात्रता नसणाऱ्या सदस्यांचा सहभाग असलेला आयोगाचा अहवाल हा न्यायालयाच्या कसोटींवर टिकणे अवघड आहे. न्यायालयाच्या अहवालात निवडणुकांमधील प्रतिनिधीत्वाच्या माहितीला सर्वाधिक महत्व होते. मात्र तीच माहिती दिली गेले नसल्याने ओबीसींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा आयोग बरखास्त करावा व पात्र सदस्यांची नव्याने नियुक्ती करावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.

गौप्यस्फोट करणार

ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी संघर्ष करण्याची भाषा करतात, वेगळी संघटना काढतात, मात्र त्यांची कृती ओबीसी विरोधी आहे. त्यांच्या विभागाच्या विरोधामुळेच ओबीसी आरक्षण जाण्यास मदत केली आहे. यासंबंधीचा गौप्यस्फोट पुण्यात करणार असल्याचेही ढोणे यांनी म्हटले आहे.