जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

पुणे: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. विक्रम गोखले यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गेल्या १५ दिवसांपासून या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. ८२ वर्षीय विक्रम गोखले यांची तब्येत सध्या नाजूक (Vikram Gokhale Health Update) असल्याने कुटुंबीय आणि चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुट्टी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाली आहे. आपल्या भारदस्त अभिनयाने त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.