‘त्यांचा चेहरा खूप पांढरा पडला होता’, विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीनेही व्यक्त केला मृत्यूवर संशय

Mumbai – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. दरम्यान, आता  विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर त्यांची पत्नी डॉक्टर ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी संशय व्यक्त केला आहे. मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहर अतोनात पांढरा पडला होता, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला हवे. त्यामुळे या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी देखील ज्योती मेटे यांनी केली आहे. ज्योती मेटे म्हणाल्या, मी स्वत: डॉक्टर आहे. विनायक मेटेंना रुग्णालयात आणताच त्यांचे शरीर पाहिल्यानंतर समजले होते की, हा अपघात काही वेळेपूर्वी झालेला नाही. किमान दीड, दोन तासांपूर्वी अपघात झालेला असावा. अपघातानंतर नेमके काय झाले, हे मला माहिती नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.

ज्योती मेटे यांनी सांगितले, रविवारी पहाटे मला सर्वप्रथम विनायक मेटेंच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला, तेव्हा मला वाटले ते घरीच आले. तेव्हा मला प्रथम त्यांच्या अपघाताबाबत कळाले. नंतर मी पुन्हा त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागला नाही. तरीदेखील मी तातडीने पोलिस व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देऊन त्यांना तातडीने घटनास्थळी रवाना होण्यास सांगितले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपत्कालीन सेवा असलेल्या रुग्णवाहिकेचा नंबर सर्वांनाच माहित असतो. मेटे यांच्या ड्रायव्हरला तो माहित नसेल हे शक्य नाही. ड्रायव्हरने आम्हाला ते नेमके कुठे आहेत, हेदेखील सांगितले नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.