आपल्या आवडत्या प्राण्याला घेऊन दुसऱ्यांच्या दारात विष्ठा करण्यासाठी निर्ल्लजपणे उभे राहणारे प्राणी मित्र कसे ?

विनीत वर्तक – पाळीव प्राणी (Pets) हे नेहमीच माणसाच्या आयुष्याचा भाग राहिलेले आहेत. आपल्या समाजरचनेतही त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. पाळीव प्राणी अनेकदा माणसापेक्षा इमानदार असल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकलेली आणि बघितलेली आहेत. त्यांना लावलेला लळा आणि केलेलं प्रेम हे त्यांच्याकडून परत मिळण्याचे अनेक किस्से आपण अनेकदा वाचतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांबद्दल आकस असण्याचे काही कारण नाही. पण सध्या समाजात त्यांच्यावरच्या बेगडी प्रेमाने शिरकाव केला आहे. प्रेम करण्यापेक्षा दाखवण्यावर आजकाल भर दिला जातो आहे. त्यांच्या स्वच्छतेबद्दल जागरूक असणारे प्राणीमित्र जेव्हा विष्ठा करण्यासाठी दुसऱ्याच्या दारात उभं करतात तेव्हा नक्की हे प्रेम आणि आस्था खरी की खोटी असा प्रश्न पडतो.

दररोज सकाळी उठून आपल्या आवडत्या प्राण्याला घेऊन दुसऱ्यांच्या दारात विष्ठा करण्यासाठी निर्ल्लजपणे उभे करणारे प्राणी मित्र आपल्याला दररोज दिसतात. फेसबुक आणि सोशल मिडिया वरून प्राणी प्रेमाचं भरतं आलेल्या आणि आपल्या कुत्रा, मांजरावर भरभरून लिहीणाऱ्या अनेक लोकांची सकाळ ही त्यांच्या पाळीव प्राण्यांना दुसऱ्यांच्या दारात घाण करण्यासाठी नेण्यात जात असते. आपलं प्राणी प्रेम जगाला दाखवण्यासाठी अगदी ४० ते ५० हजार खर्च करून इथल्या वातावरणात न राहणारी कुत्रे आणि मांजर पाळून आपणच काय ते प्राणी मित्र असल्याच्या अविर्भावात ते जगत असतात. बरं इतके पैसे खर्च करून पाळलेल्या त्या कुत्र्या, मांजराच्या विष्ठेची सोय मात्र दुसऱ्याच्या गेटसमोर किंवा सोसायटीत किंवा रस्त्याच्या कडेला करण्याबद्दल हे लोक आग्रही असतात. त्यांची घाण आपण साफ केली पाहिजे याचं साधं सौजन्यही दाखवण्याची त्यांची मानसिकता नसते. आपल्या कुत्र्याला आणि मांजराला आपल्या घरात अगदी गादीवर लोळवणारे जेव्हा दुसऱ्याच्या घरासमोर घाण करून ही जागा पब्लिक आहे असं मान वर करून बोलतात तेव्हा तीच घाण उचलून त्यांच्या घरात टाकण्याचा मोह अनेकदा होतो.

पावसाळ्याच्या दिवसात याच घाणीमुळे कित्येक रोगांचा धोका वाढतो पण काय आहे, आपलं ते घर आणि दुसऱ्याचा तो उकीरडा हे मानून सोशल मिडियावर आपल्या बेगडी प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या प्राणीमित्रांची हे समजण्याची मानसिकता नसते. ज्याप्रमाणे उठ सांगितल्यावर उठणारा तो पाळीव प्राणी आणि बस सांगितल्यावर बसणाऱ्या पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या अभिमानाने शेअर करणाऱ्या प्राणी मित्रांनी त्यांच्या विष्ठेची आपण कशी विल्हेवाट लावतो याचे ही व्हिडीओ शेअर करावेत. पण ते शक्य होणार नाही. दुसऱ्याच्या गेटवर , भिंतीवर, सोसायटी, गार्डन, रस्त्यावर आपल्या परदेशातून आयात केलेल्या पाळीव प्राण्याची विष्ठा रोज सकाळी आणि रात्री नित्यनियमाने पेरणाऱ्या या लोकांना ते झेपणार नाही. कारण त्यात त्यांना घाण वाटते. आपलं पाळीव प्राण्यांचं प्रेम हे फक्त त्याच्या घरामधील गोष्टींसाठी मर्यादित असते. रस्त्यावर, गल्ली बोळात झुंडीने रात्री-अपरात्री जाणाऱ्या सामान्य माणसांवर भुंकून आणि हल्ले करणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर दया आणि प्रेम दाखवण्याची एक नवीन स्पर्धा सुरू झालेली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे कितीतरी लहान मुलांना त्रास झालेला आहे.

वयोवृद्ध माणसांना लागलं आहे. रात्री कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. बाईक आणि गाडीचे कितीतरी अपघात या अश्या कुत्र्यांमुळे झालेले असताना भूतदया दाखवण्याच्या नादात आणि आम्ही प्राणीप्रेमी सिद्ध करण्याच्या नादामुळे अनेकांना त्याचा त्रास होतो आहे. कारण हे बेगडी प्रेम करणारे दोन दिवस येऊन, त्यांना दूध पाजून किंवा खायला देऊन आपल्या घरात स्वस्थ बसतात, पण त्याच्यामुळे चेकाळलेल्या या कुत्रा-मांजरीचा त्रास मात्र तिकडे राहणाऱ्या लोकांना भोगावा लागतो. त्यांच्या चावण्यामुळे रेबीज सारख्या रोगाची लागण होते. मला तर एक नेहमी प्रश्न पडतो की पाळीव प्राण्याबद्दल इतकेच प्रेम वाटणारे प्रत्यक्षात मात्र त्यांना आपल्या घरासमोर सुद्धा येऊन देत नाहीत.

सरसकट पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम वाटणारे असे असतात असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण आक्षेप हे बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांवर आहेत, जे दाखवण्यासाठी प्रेम करतात. प्रत्यक्षात त्यांच्या या प्रेमामुळे अनेकांना त्याचा त्रास होत असतो याची कल्पना पण त्यांना नसते. कल्पना असली तरी ती स्वीकारण्याची मानसिकता नसते. अश्या भटक्या कुत्र्यांची जबाबदारी सरकारने किंवा तिथल्या पालिकेने घ्यावी असं असतानाही पालिकेमध्ये हेच लोक मानवतेची बाजू घेऊन जेव्हा अश्या कुत्र्यांना पुन्हा मोकाट सोडण्याची तजवीज करतात तेव्हा नक्की हसावं की रडावं हेच कळत नाही.

पाळीव प्राण्यांबद्दल मला आकस आहे असं नाही. पण पाळीव प्राण्यांचं संगोपन करताना आपल्या मुलांप्रमाणे सर्व जबाबदारी घेण्याची मानसिकता बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांमध्ये नसते हे प्रकर्षाने दिसून येते. आपलं प्रेम आपल्या पुरती मर्यादित ठेवून त्याचं प्रदर्शन न करण्याची प्रगल्भता शिकवण्याची गरज आज नक्कीच आहे. आपण जर एखादी जबाबदारी स्वीकारत आहोत तर ती संपूर्णपणे निभावण्याचं व्रतही पूर्ण करायला हवं. सोयीस्कर बेगडी प्रेमामुळे त्याचे त्रास आपल्या आजूबाजूच्या लोकांना होतात याचं भान जरी आलं तरी आपण एक पाऊल पुढे गेलो असं मी म्हणेन.

ता.क. :- वरील पोस्ट मध्ये मांडलेले मुद्दे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. सरसकट सगळेच तसे असतात असं माझं म्हणणं नाही किंवा तसा कोणता हेतू नाही. पोस्टचा उद्देश बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांना आरसा दाखवण्याचा आहे.

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.